कॉ. गोविंद पानसरे हत्येचा खटला कोल्हापुरात चालवावा, एटीएसकडून न्यायालयात अहवाल सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला येथील जिल्हा सत्र न्यायालयातच चालवावा यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव दिल्याचा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) अधीक्षक तुषार दोशी यांनी आज विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यातर्फे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात सादर केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपस्थित होते. पुढील सुनावणी येत्या 19 सप्टेंबरला होत आहे.

कॉ. पानसरे खटल्यातील साक्षीदार, पंच, संशयित आरोपी यांना सोलापूर न्यायालयात ये-जा करणे जोखमीचे असल्याने हा खटला कोल्हापुरातील न्यायालयात चालवावा, असा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाकडून राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे. या खटल्यातील संशयित आरोपी समीर गायकवाड हा आज न्यायालयात हजर होता. हा तपास एटीएसकडे देण्यात आल्याने संशयित गायकवाड याची विशेष तपास पथकाकडे हजेरी देण्यासंदर्भात संशयित आरोपींचे वकील प्रीती पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला होता. यावर ऍड. राणे यांनी एटीएस अधिकाऱयांशी चर्चा करून पुढील सुनावणीपर्यंत गायकवाड याने कोल्हापुरात एसआयटीमध्येच प्रत्येक रविवारी हजेरी द्यावी, अशी विनंती केली. यावर न्यायाधीश तांबे यांनी पुढील सुनावणीपर्यंत कोल्हापुरातच हजेरी द्यावी, असे आदेश दिले.