
सामना प्रतिनिधी, मुंबई
माहुलवासीयांचा प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गंभीर असून कुर्ला येथील एचडीआयएलच्या संक्रमण शिबिरात माहुलवासीयांचे तात्पुरते स्थलांतर करण्याबाबत चार दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज दिले. माहुलवासीयांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मात्र सुरक्षित जागी पुनर्वसन करण्याचा निर्णय पुढील चार दिवसात न घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा माहुल प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने देण्यात आला.
जीवघेण्या माहुलमध्ये पुनर्वसन केलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांनी रविवारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या घरावर धडक दिल्यावर अखेर सरकारला जाग आली. माहुलवासीयांचा रुद्रावतार पाहून मेहतांनी माहुल प्रकल्पग्रस्त समितीला मंत्रालयात चर्चेसाठी बोलावले. या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व इतर खात्यांचे मिळून 25 ते 30 अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश मेहता म्हणाले की, माहुलवासीयांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. एचडीआयएलच्या संक्रमण शिबिरात माहुलवासीयांचे तात्पुरते स्थलांतर करणे शक्य आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पाईपलाईनवरील झोपडपट्टीधारकांचे यापूर्वी माहुलमध्ये पुनर्वसन केले होते. पण या लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे समोर आल्यानंतर त्यांचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्या आहेत. माहुलवासीयांना एचडीआयएलच्या संक्रमण शिबिरात घरे देण्याचा विचार आहे. पण ही घरे विमानतळ प्राधिकरणाच्या क्षेत्रातील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी राखीव ठेवली आहेत. त्या संदर्भात कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन माहुल येथील रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे मेहता यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनाचा सोळावा दिवस
माहुल प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने बोलताना अनिता ढोले म्हणाल्या की, आज आमच्या आंदोलनाचा सोळावा दिवस होता. 28 ऑक्टोबरपासून आम्ही ‘जीवन बचाव’ आंदोलन सुरू केले आहे. प्रकाश मेहता यांच्या घराला घेराव घातल्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि आम्हाला मंत्रालयात चर्चेला बोलावले. कुर्ला पूर्व येथील एचडीआयएलच्या संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतर करण्याचे आश्वासन आम्हाला गृहनिर्माण मंत्र्यांनी दिले आहे.
कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय होईपर्यंत संबंधित कुटुंबांना कुर्ला एचडीआयएल येथे ट्रान्झिस्ट घरे देता येणे शक्य आहे. तसेच त्याच जागेवर पुनर्वसन करण्याची शक्यता तपासली गेली पाहिजे. हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
-प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्री
summary- govt to immigrate mahul citizens to kurla

























































