1 ऑक्टोबरपासून पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदार नावनोंदणीची मोहीम 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. राज्यातील नाशिक, अमरावती विभाग पदवीधर तसेच संभाजीनगर, नागपूर आणि कोकण विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघामध्ये वर्ष 2023 मध्ये होणाऱया द्विवार्षिक निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यात येतील.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना अर्ज 18 आणि शिक्षक मतदार नोंदणीसाठी नमुना अर्ज 19 भरावयाचा आहे. नोंदणी कालावधी झाल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्यानंतर 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकात म्हटले आहे.

द्विवार्षिक निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मतदान करण्यासाठी पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी नावनोंदणी करावी. त्यासाठी विभागांतर्गत येणाऱया विद्यापीठे व महाविद्यालयांनी मतदार नावनोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.