
सोशल सिक्युरिटी कोडच्या नियमांत बदल होण्याची शक्यता असून आता वर्षभर नोकरी केल्यासही त्या कर्मचाऱयाला ग्रॅच्युईटी लागू होणार आहे. आतापर्यंत पाच वर्षे नोकरी केल्यानंतर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळत आहे. तसेच ‘एम्प्लॉईज पेन्शन स्किम’मध्ये (ईपीएस) केंद्र सरकारचा 1.16 टक्केचा हिस्सा कायम असणार आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार सोशल सिक्युरिटी कोडशी संबंधित बिल सादर करणार आहे. हे बिल सादर होण्यापूर्वी त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. या बिलाविषयी विविध क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी सुचविलेल्या सूचना आणि हरकती विचारात घेऊन बिलामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
नॅशनल पेन्शन सिस्टम बंद?
केंद्र सरकार ईपीएसमध्ये 1.16 टक्के भागीदारी पुन्हा सुरू करीत आहे. त्याचबरोबर नॅशनल पेन्शन सिस्टमदेखील पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे. त्याऐवजी नवी पेन्शन योजना लागू करण्याचा केंद्राचा विचार आहे. मात्र केंद्राने सोशल सिक्युरिटी कोडच्या नियमात बदल करण्याची घाई करू नये अशी मागणी होत आहे.
सोशल सिक्युरिटी कोड कामगारविरोधी
भारतीय मजदूर संघाचे महासचिव विरजेश उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या सोशल सिक्युरिटी कोडमध्ये अनेक गोष्टी कामगारविरोधी आहेत. विविध कंपन्या आणि आस्थापनेत 80 टक्के कामगारवर्ग कंत्राटी तत्त्वावर काम करीत असल्याने ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षे नोकरीची अट काढून टाकून ती एक वर्ष करावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली असल्याचे उपाध्याय यांनी स्पष्ट केले.

























































