
चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर हजारो बौद्ध जनतेच्या उपस्थितीत 69 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या मध्यभागी डॉ. आंबेडकरांच्या अस्थींचा कलश होता. हजारोंच्या संख्येने बौद्ध जनता या मिरवणुकीत सहभागी झाली होती. समता सैनिक दलाचे शिस्तबद्ध संचलन सोहळ्याचा लक्षवेधी बिंदू ठरले. सुमारे 3 किमी. मार्गक्रमण करत ही मिरवणूक चंद्रपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अर्थात दीक्षाभूमीवर पोचली. या ठिकाणी सामुहिक बुद्धवंदना पार पडली. विस्तीर्ण दीक्षाभूमी परिसर हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीने फुलून गेला असून इथे पोचलेल्या अनुयायांना शेकडो पुस्तक स्टॉलच्या माध्यमातून वैचारिक पर्वणी मिळणार आहे. आज जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज असल्याचे मत याप्रसंगी धम्म अभ्यासकांनी व्यक्त केले.