आजीने तंबाखू खायला विरोध केला, 9 वर्षाच्या नातीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजकाल लहान मुलं काय करतील याचा नेम नाही. त्यांना चांगल्या-वाईट गोष्टींबाबत कशी समज द्यावी हेच कळत नाही. कारण त्यांच्या एखाद्या चुकीच्या सवयीबाबत त्यांना रागवल्यावर टोकाचे पाऊल उचलण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना छत्तीसगढमध्ये घडली आहे.

छत्तीगढमध्ये सध्या विविध जिल्ह्यांमध्ये तंबाखू मुक्ती मोहीम सुरू आहे. अशातच येथील सरगुजा जिल्ह्यामध्ये अतिशय आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे.

सरगुजा जिल्हा तंबाखूमुक्त व्हावा, याकरिता जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तंबाखू खाल्ल्याने होणारे आजार आणि त्याचे संभाव्य धोके याविषयी माहिती देऊन येथील लोकांना जागरूक केले जात आहे, मात्र येथील काही नागरिकांवर या मोहिमा आणि उपक्रमांचा परिणाम होत नसल्याचे एका घटनेवरून लक्षात आले आहे.

सरगुजा जिल्ह्यातील भिठुआ गावात राहणाऱ्या एका 9 वर्षाच्या मुलीला तंबाखू, गुटखा खाण्याचे व्यसन होते. एक दिवस तिची आजी तिला तंबाखू, गुटखा खाण्यास विरोध करू लागली. आजीने तंबाखू खायला मनाई केल्यामुळे तिला आजीचा खूप राग आला. रागाच्या भरात तिने घराच्या मागील जागेत ओढणीने गळफास घेतला आणि आत्महत्या केली.

या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमुळे तिचे नातेवाईक आणि कुटुंबियांना धक्का बसला आहे शिवाय पोलीस आणि गावातील लोकंही थक्क झाले आहेत.

पोलिसांनी पीडित मुलीच्या आजीकडे या घटनेबाबत चौकशी केली असता तिने सांगितले की, तिची 9 वर्षाची नात सतत गुटखा, तंबाखू खायची. एक दिवस मी तिला ही वाईट सवय असल्याचे सांगितले आणि यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा तिला राग आला. रागाच्या भरात तिने आत्महत्या केली.

पोलिसांनी या मुलीचे प्रेत तात्काळ ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनाकरिता सीतापूर सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात पाठवले आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती सीतापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रूपेश नारंग यांनी दिली आहे.