
ग्रॅण्ट रोडचा परिसर आज दुपारी एका भयंकर हत्याकांडाने हादरला. पार्वती मेन्शन या इमारतीत राहणारा आणि कोणाशीही न बोलणारा चेतन गाला (54) हा अचानक हैवान झाला आणि समोर दिसेल त्याला त्याने चाकूने भोसकत सुटला. चेतनच्या या अंदाधुंद चाकूहल्ल्यात तिघांचा जीव गेला, तर दोघे गंभीर जखमी झाले. डॉ. भडकमकर मार्ग पोलिसांनी त्या माथेफिरूला बेडय़ा ठोकल्या.
पार्वती मेन्शन या इमारतीत नेहमीप्रमाणे दुपारी शांतता होती. दुपारचे जेवण करून रहिवासी निवांत होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना तीनच्या सुमारास अचानक इमारतीत हाहाकार उडाला. इमारतीच्या दुसऱया मजल्यावर अक्षरशः रक्तपात सुरू होता. चेतन गाला हा चाकू घेऊनच घराबाहेर आला आणि शेजारी राहणाऱया ईलाबाई मिस्त्र्ााr (70) यांना चाकूने भोसकायला सुरुवात केली. त्यापाठोपाठ त्याने ईलाबाईचे पती जयेंद्र भाई (77) यांना पकडले आणि काही कळायच्या आत चेतनने त्यांना जमिनीवर आडवे पाडून भोसकले. यानंतर तेथेच झोपलेल्या प्रकाश वाघमारे (55) यांच्यावरदेखील त्याने चाकूहल्ला केला.
या हल्ल्यामुळे प्रचंड आरडाओरड होऊ लागल्याने पहिल्या मजल्यावर राहणाऱया स्नेहल ब्रह्मभट्ट (46) आणि त्यांची मुलगी जेनिल (18) यांनी काय झाले हे बघायला दुसऱया मजल्यावर धाव घेतली, पण त्यांच्या बरोबरदेखील अपरित घडले. दोघीही समोर आल्यावर चेतनने त्यांच्यावरदेखील चाकूहल्ला केला. स्नेहल यांच्या छाती व पोटात भोसकले तर जेनिलच्या गळय़ावर वार केले. चेतन हैवानियतची परिसीमा गाठत असतानाच इमारतीमधील काही रहिवासी लाठय़ाकाठय़ा घेऊन त्याच्या दिशेने धावले. त्यामुळे घाबरून चेतन दरवाजाला कडी लावून घरात लपला. हा प्रकार कळताच डी. बी. मार्ग पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन चेतनला पकडले. या चाकूहल्ल्यात जयेंद्रभाई, त्यांची पत्नी ईलाबाई मिस्त्र्ााr तसेच जेनिल ब्रह्मभट्ट यांचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला, तर स्नेहल यांची प्रकृती चिंताजनक होती.
म्हणून सटकली…
चेतन गेल्या दोन महिन्यांपासून घरात एकटाच राहत होता. त्याची पत्नी त्यांच्या दोन मुली व मुलाला घेऊन शेजारच्याच इमारतीत सासरी राहायला गेली होती. यामुळे त्याला नैराश्य आले होते. त्यातच शेजारच्यांनी पत्नीचे डोक भडकावले असे सतत वाटत होते त्या रागातून मिस्त्र्ााr दांपत्यावर हल्ला केला आणि समोर येईल त्यालाही मारले असे प्राथमिक तपासात चेतन सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दहा वर्षांचा चिमुकला बचावला
चेतन दुसऱया मजल्यावर रक्तपात करत असताना तिसऱया मजल्यावर राहणारा दहा वर्षांचा मुलगा सहज खाली आला. त्यालाही त्याने पकडले, पण दैव बलवत्तर तो चिमुकला चेतनच्या तावडीतून निसटला. रहिवासी धावून आल्यामुळे चेतन घाबरला आणि त्याने मुलाला सोडले.