तांब्यामुळे उघडे पडले नवरदेवाचे पितळ; तरुणीने दिला लग्नाला नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखीमपूर

लग्न ठरून मोडल्याची अनेक उदाहणे आहेत. त्यामागे अनेक कारणे असतात. अशीच घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये घडली आहे. नवरदेव पूजेच्यावेळी पाण्याने भरलेला कलश उचलू शकला नाही, म्हणून तरुणीने लग्नाला नकार दिला आहे. एका ताब्यांच्या कलशामुळे नवरदेवाचे पितळ उघडे पडल्याने वधूला न घेताच रिकाम्या हाती परतण्याची वेळ नवरदेवावर आली.

लखीमपूर खीरीमध्ये विवाहाची तयारी पूर्ण झाली होती. नवरदेव वऱ्हाड घेऊन गावाजवळ आला. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंडपाजवळ पोहचल्यावर द्वापूजनाचा विधी सुरू करण्यात आला. त्यावेळी पुजाऱ्याने नवरदेवाला कलश उचलून मंडपात पाणी शिंपडण्यास सांगितले. मात्र, खूप प्रयत्न करूनही नवरदेवाला कलश उचलता आला नाही. त्यामुळे वधूपक्षाकडील मंडळींना नवरदेवाबाबत संशय आला. त्याला घरात बोलावून पाणी भरलेला तांब्या उचलण्यास सांगितले. त्यावेळी तांब्या उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे हात कापू लागले. त्यामुळे थरथरत्या हाताने तो तांब्या उचलण्याचा प्रयत्न करत होता. नववधूला ही गोष्ट समजताच तिने लग्नाला नकार दिला. तिच्या नकाराने खळबळ उडाली. वधू आणि वर पक्षाकडील मंडळींना तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती तयार झाली नाही. त्यामुळे नवरदेवाच्या वडिलांनी पोलिसांनी बोलावले. प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही ती नकारावर ठाम होती. पोलिसांनी वधू आणि वरपक्षामध्ये तडजोड केली. त्यांनी एकमेकांच्या घेतलेल्या वस्तू आणि लग्नाचे बस्ते परत करण्याचे ठरले आणि लग्नाशिवायच वरात माघारी घेऊन जाण्याची नामुष्की नवरदेवावार ओढवली.

मुलाचा एक हात लूळा होता. त्यामुळे त्या हाताने तो कोणत्याच वस्तू उचलू शकत नव्हता, त्यामुळे लग्नाला नकार दिल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. मात्रस,लग्नाच्या आधी ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली. द्वारपूजनाच्यावेळी त्याला कलश उचलता आली नाही. त्यामुळे सत्य उघड झाले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे तिने सांगितले. एका कलशामुळे पितळ उघडे पडल्याने नवरदेवाला रिकाम्या हाती परतावे लागले आहे.