नवरीला भुताने पछाडलं म्हणत नव-याने मांडवातून धूम ठोकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरीला भुताने पछाडलंय, असा म्हणत नवऱ्याने लग्नाच्या दिवशी वरातीसह मांडवातून पळ काढल्याची घटना उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे घडली. वधूच्या नातेवाईकांनी नवऱ्यासह त्यांच्या घरच्यांविरोधात याप्रकरणी पोलिसांत तक्रार  केली आहे.

उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील मैनपुरी येथील नवीगंज गावातील तरुण देवेंद्र याचे लग्न जगतपूर गावात राहणाऱ्या शिवानी नावाच्या तरुणीशी ठरले होते. लग्नाच्या दिवशी नवरा देवेंद्र वरातीसह जगतपूर गावात आला, पण तिथल्या भयंकर उकाड्यामुळे आणि तहानेने व्याकूळ झालेला देवेंद्र चक्कर येऊन बेशुद्ध पडला. असे कसे झाले ? हा प्रश्न नातेवाईकांना पडला. त्यांना त्याची काळजी वाटू लागली होती. अचानक देवेंद्रच्या नातेवाईकांनी शिवानीसोबत होणारे हे लग्न मोडत असल्याचं सांगायला सुरुवात केली. शिवानी आजारी असून तिला भूतबाधा झाली आहे, असं म्हणत देवेंद्र नातेवाईकांसह  मांडवातून पळून गेला.

या घटनेनंतर वधूच्या नातेवाईकांनी पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेविषयी तक्रार केली. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे देवेंद्र आणि त्याच्या घरच्यांनी हे कुभांड रचल्याचा त्यांनी आरोप केला आहे. शिवानीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की देवेंद्रला हुंड्यापोटी टीव्ही, फ्रिज, कूलर, बाईक आणि बेड या वस्तू दिल्या होत्या. लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या नातेवाईकांनी 50 हजार रुपयांची मागणी केली होती, पण एवढे पैसे न दिल्यामुळे खोटे आरोप करून नवऱ्याकडची मंडळी पळून गेली असं शिवानीच्या वडिलांचं म्हणणं आहे.