
सहकारी गृह सोसायटय़ांना दैनंदिन कामकाज करताना येणाऱया समस्या, प्रश्न कसे सोडवावेत. पालिकेतील रखडलेली कामे कशी करावीत, सोसायटीचे कामकाज पारदर्शकपणे कसे करावे, हिशेब कसे ठेवावेत याबाबतचा उत्कृष्ट मंत्र गृह सहकार मेळाव्यात सोसायटय़ांच्या पदाधिकाऱयांना मिळाला आहे. शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांनी आंधेरी पूर्व आणि पश्चिम येथे या गृह सहकार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याला परिसरातील सोसायटय़ांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सहकारी गृह सोसायटय़ांची नोंदणी करण्यास होणारी दिरंगाई, ओ.सी.ला होणारा उशीर, महापालिकेकडून सोसायटीपर्यंतचे अपूर्ण राहिलेले रस्ते, विकसित सोसायटय़ांमध्ये रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, सोसायटीअंतर्गत हिशेबाची अफरातफर, विकसित सोसायटीतील आरक्षित खेळाचे, मनोरंजनाचे मैदान हस्तांतरित न करणे अशा विविध समस्यांचा सामना करावे लागतो. त्याची दखल घेत खासदार गजानन कीर्तिकर यांनी त्या समस्या कशाप्रकारे हातावेगळ्या कराव्यात यासाठी गृह सहकार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी कीर्तिकर यांनी सोसायटय़ांना उत्कृष्ट कामकाज करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे सचिव रमेश प्रभू, महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष, मुबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. उदय वावीकर, आर्किटेक्ट हितेंद्र मेहता, सहाय्यक निबंधक विरधवल जाधव, उपनिबंधक नितीन दहीभाते, कार्यकारी अभियंता (इमारत प्रस्ताव) नवनाथ घाडगे यांनी मार्गदर्शन केले. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम व वर्सोवा विधानसभेतील पदाधिकाऱयांनी अथक परिश्रम घेतले.


























































