
जीएसटी भरपाईसाठी केंद्र सरकारने सुचवलेले दोन्ही पर्याय धुडकावून लावत पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीत बादल यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र लिहिले आहे. केंद्राचे दोन्ही पर्याय हे ‘संवैधानिक विश्वास’ तोडणारे आहेत, असा दावा बादल यांनी केला आहे. राज्य सरकारांना अनुच्छेद 293 अन्वये कर्ज घेण्याचा अधिकार देणे याला कदापी भरपाई म्हणता येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर नाराजी प्रकट केली.
जीएसटी कौन्सिलची 27 ऑगस्टला बैठक झाली होती. त्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जीएसटी भरपाईसाठी राज्यांना दोन पर्याय दिले होते. त्यानुसार जीएसटी वसुलीतील तूट भरून काढण्यासाठी राज्ये कर्जे घेऊ शकतात. केंद्राने या पर्यायांवर राज्यांची मते मागवली असून त्यानुसार पंजाबने विरोधी भूमिका मांडली आहे. केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. जीएसटी प्रणाली ज्या को-ऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या तत्वावर उभारली गेली, त्या तत्त्वांसोबत केंद्र सरकारने विश्वासघात केला आहे, असा आरोप मनप्रीत बादल यांनी केला आहे.
























































