तिसरी लाट आल्यास रुग्णसंख्या चौपट होऊ शकते, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची तिसरी लाट आली तर सध्याच्या रुग्णसंख्येपेक्षा रुग्णसंख्या चार पटींनी वाढू शकते. त्यामुळे सर्वांनीच कोरोना नियमांचे पालन करायला हवे, अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

पाथर्डी येथील संस्कार भवन येथे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, पंचायत समिती सभापती क्षितिज घुले, प्रांताधिकारी देवदत्त केकाण हे उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ यांनी जामखेडमध्येही कोरोनाचा आढावा घेतला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, पहिल्या लाटेत शेवगाव व पाथर्डी तालुक्यात रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, दुसऱया लाटेत ही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. कोरोनाच्या दोन्ही लाटांना केरळमधूनच सुरुवात झाली होती. आतासुद्धा कोरोनाची तिसरी लाट केरळमध्ये आली असल्याने सर्वांनी सावध राहायला हवे. या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत ऑक्सिजन प्लाण्ट उभारण्यात आले आहेत.

सध्या पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. तालुक्यात लवकरच मुळाचे आवर्तन सोडले जाणार असून, तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली भगवानगड पाइपलाइन योजना कार्यान्वित करण्यासाठी मुंबईत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू. या योजनेच्या मुद्दय़ावरून कोणीही राजकरण करू नये, असेही ते म्हणाले.

लोकसंख्येप्रमाणे सध्या लस मिळत असल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी असले तरीही येत्या डिसेंबरअखेर 70 टक्के नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळी असले तरीही या दोन्हीही तालुक्यांतील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.