कोरोनाला हरवण्यासाठी पोलीस बनले डॉक्टर, गुजरातमधील आयपीएस अधिकाऱयांकडे दुहेरी जबाबदारी

देशात कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारे आणि महापालिका विविध मोहिमा राबवत असताना गुजरातमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी 18 पोलीस अधिकारीच डॉक्टर बनले आहे. भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) येण्याआधी हे अधिकारी पेशाने डॉक्टर होते. त्यामुळे आता कोरोनाविरोधात लढाईत अशा पोलीस अधिकाऱयांनी खाकीबरोबर पुन्हा डॉक्टरी पेशा अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारत रुग्णसेवा सुरू केली आहे.

गुजरातमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. त्यावर गुजरात पोलिसांनी एक उपाय शोधून काढला आहे. ज्या पोलीस अधिकाऱयांची पार्श्वभूमी वैद्यकीय क्षेत्राची आहे अशा 18 पोलीस अधिकाऱयांकडे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील कोरोनाग्रस्तांना वैद्यकीय मदत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून तर आता थेट खाकी आणि डॉक्टरी पेशा अशी दुहेरी जबाबदारी हे अधिकारी स्वखुशीने स्वीकारत कोरोनाशी दोन हात करत आहेत.

  • मेहसाणा जिह्यात सेवा देणारे डॉ. पार्थ राज हे गोहील जिह्याचे पोलीस अधीक्षक आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच पार्थ पोलीस कुटुंबीयांवर उपचार करत आहेत. पार्थ हे आयपीएस अधिकारी बनण्याआधी डॉक्टर होते.
  • बडोद्याचे पोलीस आयुक्त डॉ. करण वाघेला हेही आयपीएस बनण्याआधी डॉक्टर होते. त्यामुळे वाघेला हे सध्या एसआरपी परिवारांची काळजी घेत आहेत. त्यांच्या वैद्यकीय सल्ल्यासाठी आता पोलीस कर्मचारी वाघेला यांना थेट फोन करून मदत घेत आहेत.
  • वलसाड जिह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. राजदीप झाला हेदेखील कोरोनाग्रस्त पोलीस कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांसाठी पुढे आले आहेत. पोलीस कॉलनी तसेच कोरोना सेंटर्समध्ये ते सेवा बजावत आहेत. कोरोना रुग्णालयांमध्ये रोज जाऊन उपचार तसेच विचारपूस करून त्यांना धीर देत असतात. पोलीस अधिकारी म्हणून मी माझ्या कुटुंबीयांसारखेच त्यांनाही आपले कुटुंब मानतो, त्यांची विचारपूस करतो. त्यामुळे त्याचे मनोबल वाढते, असा अनुभव झाला यांनी सांगितला.
आपली प्रतिक्रिया द्या