
महिलांना साडीचे खूप आकर्षण असते. सण-समारंभ, लगीनसराई, वाढदिवस किंवा अन्य सोहळ्यांमध्ये आपण सुंदर साडी नेऊन जावं असं अनेक जणींना वाटतं. मात्र प्रत्येक वेळी महागडी साडी विकत घेणे महिलांच्या आवाक्याबाहेर असतं. महिलांची ही अडचण ओळखून गुजरातमधील बडोदा येथील आठ मैत्रिणींनी एकत्र येऊन ‘अष्टसहेली’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात केवळ अडीचशे रुपये शुल्क भरून पाच दिवसांसाठी तीन सिल्कच्या साडय़ा भाडय़ाने दिल्या जातात.
बडोद्याच्या जुन्या पदरा रोडवरील मल्हार पॉइंट येथे जून 2020 मध्ये हेमा चौधरी यांनी साडी लायब्ररी सुरू केली. त्यांच्या ग्रुपमध्ये साधना शाह, गोपी पटेल, नीला शाह, रिटा विठलानी, पारुल पारीख, नीलिमा शाह आणि ट्विंकल पटेल यांचा समावेश आहे.
अष्टसहेलीच्या संस्थापक हेमा चौहान सांगतात, माझ्या घरातील मदतनीसाच्या भावाचे लग्न होते. त्यावेळी तिच्याकडे लग्नामध्ये वापरण्यासाठी चांगला पोशाख नव्हता. म्हणून मी तिला माझी चनिया चोली दिली. तो ड्रेस लग्नात सगळ्यांना आवडला. ड्रेस कुठून घेतला, अशी लग्नात सगळ्यांनी विचारणा केली. तिला तो ड्रेस इतका आवडला की, मी तिच्याकडून परत मागितला नाही. त्यावेळी मला वाटलं की, आपल्यापैकी बहुतेकांकडे विविध प्रकारचे आकर्षक पोशाख असतात. ते आपण एकदा किंवा दोनदा परिधान करून कपाटात ठेवून देतो. महागडय़ा साडय़ा खरेदी करणे अनेक जणींना परवडत नाही. याच विचारातून साडय़ांची लायब्ररी ही संकल्पना डोक्यात आली. आम्ही मैत्रिणींनी आमच्याजवळील प्रत्येकी पाच पोशाख दान करून लायब्ररी सुरू केली.
साडी लायब्ररी दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत सुरू असते. ग्रुपमधील प्रत्येक महिला दोन दिवस काम करते. लगीनसराईत अनेक महिला येतात. अनेकदा मॅचिंगसाठी ब्लाऊजसोबत आणतात. या कपडय़ांसोबत दान केलेल्या पर्स, दागिने आणि पादत्राणे ठेवण्याचाही त्यांचा विचार आहे.
- पोशाख भाडय़ाने देताना संबंधित ग्राहकाला 500 रुपयांचे टोकन द्यावे लागते, जे पोशाख जमा केल्यानंतर परत केले जाते. या टोकनमधून फक्त ड्रायक्लिनर्सचा खर्च वजा करतो आणि तोही जास्त नाही, असे हेमा चौधरी यांनी सांगितले.
मुंबई, दिल्लीतूनही मिळते मदत
जून 2021 मध्ये ‘अष्टसहेली लायब्ररी’च्या नव्या जागेचे उद्घाटन झाले. सध्या ‘अष्टसहेली लायब्ररी’त चारशेहून अधिक साडय़ांचे कलेक्शन आहे. यामध्ये कांजीवरम सिल्क, बनारसी, कोटा चेक, बांधणी, शिफॉन, जॉर्जेट अशा प्रकारच्या साडय़ा आहेत. तसेच चनिया चोली आणि पलाझो, लेहेंगा- ब्लाऊजसारखे कलेक्शनही आहे. केवळ बडोदाच नव्हे, तर दिल्ली आणि मुंबई येथून साडय़ा, कपडे पाठवले जातात.
























































