
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. हे वादळ निवळले असून, त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्याचमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. नगर जिल्ह्याला या वादळाचा मोठा फटका बसला असून, सोयाबीन, कपाशीसह हातातोंडाशी आलेल्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नगर जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. नगर, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली, अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, नेवासा, शेवगावसह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने सोयाबीन आणि कपाशी तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत. काही ठिकाणी कांदाही भिजला आहे. सोयबीनच्या शेंगा वाळलेल्या आहेत. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, लहान व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
सीना धरण ओव्हरफ्लो
मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना ओव्हरफ्लो झाले आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यासाठी जीवनदायिनी असलेले सीना धरण सलग दुसऱ्य़ा वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्य़ांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस असतो. यंदा मान्सूनपूर्वसह मान्सूनचा पाऊसही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मुळा, भंडारदरा, निळवंडेसह बहुतेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यानंतर आता कर्जत तालुक्यातील सीना धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सीना नदीपात्रात 56 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असून, धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उजव्या कालव्यातून 100 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गातदेखील वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुळा नदीपात्रात 3255 क्युसेसने विसर्ग
कोतुळकडून पाण्याची आवक वाढल्याने पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी मंगळवारी रात्री 12 वाजता मुळा धरणातून 3 हजार 255 क्युसेसने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 6 वाजता कोतुळकडून मुळा धरणात 7 हजार 310 क्युसेसने, तर दुपारी 12 वाजता 4 हजार 227 क्युसेसने पाण्याची आवक सुरू होती. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा 25 हजार 886 दशलक्ष घनफुटावर स्थिर ठेवून इतर पाणी नदीपात्रासह कालव्यांमध्ये सोडण्यात येत आहे.
भंडारदरा, निळवंडेतून विसर्ग वाढविला
भंडारदरा, निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने भंडारदरा आणि निळवंडे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. बुधवारी सकाळी भंडारदरा धरणातून 5 हजार 540 क्युसेस, तर निळवंडे धरणातून 7 हजार 133 क्युसेसने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात प्रवरा नदीला दुसऱ्य़ांदा पूर आला आहे. भंडारदरा धरणाच्या स्पीलवे गेटमधून 4724 तर वीज केंद्रातून 816 असा एकूण 5540 क्युसेस विसर्ग सुरू आहे. तर, निळवंडे धरणाच्या स्पीलवे गेटमधून 6483, तर वीजनिर्मिती केंद्रातून 650 क्युसेस असा एकूण 7133 क्युसेस विसर्ग सुरू होता.
























































