
बंगालच्या उपसागरावर तयार झालेले गुलाब चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीवर धडकले. परिणामी, आंध्रच्या उत्तर व ओडिसाच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस होऊन घरांमध्ये पाणी घुसले. विशाखापट्टणम विमानतळही पाण्याखाली गेले. वादळाचा जोर आता ओसरला आहे. मात्र वादळाचा प्रभाव कायम राहून काही राज्यांत दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम परिसरात रविवारी रात्री वादळी वाऱयांचा तडाखा बसून बोट उलटली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. विशाखापट्टणम, विजयनगरम आणि श्रीकाकुलम या जिह्यांना वादळाचा तडाखा बसला. हवामान खात्याने महाराष्ट्रासह गोवा, छत्तीसगढ, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांना अलर्ट जारी केला असून येथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.





























































