
शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपोर्णिमा उत्सवाला मंगळवारी भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. काकड आरतीनंतर साईप्रतिमा , विणा आणि पोथीची सवाद्य मिरवणुक काढून उत्सवाला सुरूवात झाली. श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर व त्यांच्या पत्नी शोभाताई गोंदकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अमेरिकेतील साईभक्त शुभा पाई यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
या उत्सवानिमित्त असंख्य पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून दोन वर्षानंतर भाविकांना उत्सवात सहभागी होता येत असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. देश – विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना भाविक गुरूस्वरूप मानतात. आपल्या संस्कृतीत गुरूला देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते हीच भावनेने लाखो भाविक साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत.
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांनी पोथी, विश्वस्त सचिन कोते व विश्वस्त डॉ.जालिंदर भोर यांनी प्रतीमा तर विश्वस्त सुनिल शेळके यांनी विणा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष अॅड.जगदीश सावंत, विश्वस्त अॅड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, जयंतराव जाधव, महेंद्र शेळके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिर्डीत तीन दिवस गुरूपोर्णिमा उत्सव साजरा होतो. बुधवारी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे, तर अनेक धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत.




























































