
सामना ऑनलाईन। ग्वाल्हेर
कुठलेही नाते टिकवायचे असेल तर त्यासाठी दोन व्यक्तींमध्ये सहवास आणि संवाद असणे गरजेचे असते. त्यातही हे नाते जर पती पत्नीचे असेल आणि त्यांच्यात संवादच खुंटला असेल तर नात्यात दुरावा वाढण्याची शक्यताच अधिक. या सगळ्यांचाच विचार करत एसबीआय या बँकेने ‘नई दिशा’ नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत बँक आठवड्यातील एक दिवस पुरुष कर्मचाऱ्यांना घरी वेळेवर जाता यावे म्हणून वेळेची सवलत देत आहे. पण बँकेने एवढी वेळेची सवलत देऊनही कर्मचारी वेळेवर घरी पोहोचला नाही. तर त्याच्या बॉसकडे याबद्दल तक्रार करण्याचा अधिकार त्याच्या पत्नीला देण्यात आला आहे.
ग्वाल्हेर मधील 11 शाखांमध्ये बँकेने हा कार्यक्रम सुरू केला आहे. शहरात बँकेच्या एकूण 40 शाखा आहेत. त्यातील 11 शाखांमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत कुटुंब व मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचे महत्व कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले जात आहे. हा कार्यक्रम दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेदरम्यान घेतला जात आहे. विशेष म्हणजे यात कर्मचाऱ्यांच्या पत्नीही सहभागी होत आहेत. यासाठी काही शॉर्ट फिल्म कर्मचाऱ्यांना दाखवल्या जात आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा तणाव निवळेल व ते अधिकाधिक चांगले काम करतील असे बँकेचे म्हणणे आहे.
























































