माझे पेशन्स पाहू नको, हिंदुस्थानात परत ये आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून कायदेशीर कारवाईला सामोरा जा… अशा शब्दांत देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचे सुप्रीमो तसेच एच.डी. देवेगौडा यांनी एक्सवरून नातू प्रज्वलला बजावले आहे. सेक्स स्पँडलच्या आरोपानंतर प्रज्वल रेवण्णा जर्मनीला पळून गेल्यामुळे एच.डी. देवेगौडा प्रचंड संतापल्याचे समोर आले आहे.
एच.डी. देवेगौडा यांनी पक्षाच्या लेटरहेडवर पत्र लिहिले असून मी जे काही बोलतोय ते आवाहन नाही तर इशारा आहे. जर प्रज्वलने या इशाऱयाकडे दुर्लक्ष केले तर त्यांना माझ्या आणि कुटुंबीयांच्या सर्व सदस्यांच्या संतापाचा सामना करावा लागेल. जर माझ्याबद्दल तुझ्या मनात जराही आदर असेल तर तत्काळ हिंदुस्थानात परत ये असे त्यांनी म्हटले आहे. प्रज्वल रेवण्णाला माझा इशारा या मथळय़ाखाली देवेगौडा यांनी दोनपानी पत्र लिहिले आहे. 18 मे रोजी देवेगौडा यांनी 18 मे रोजी प्रज्वलबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. जेडीएसचे कार्यकर्ते, देवेगौडा यांचे संपूर्ण कुटुंब आणि मित्रांना प्रज्वलवरील आरोपांमुळे प्रचंड धक्का बसला होता. त्यातून सावरण्यासाठी वेळ लागला, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रज्वलने जे केले ते माहीत नव्हते
मी लोकांना विश्वासाने सांगू इच्छितो की, प्रज्वल जे काही करत होता ते आम्हाला कुणालाच माहीत नव्हते. तसेच माझ्याकडे हे सर्व समजण्याची क्षमताही नाही. वाईट हेतूने विविध राजकीय षड्यंत्रे रचली गेली. त्याबद्दल मला कोणतेही स्पष्टीकरण द्यायचे नाही किंवा बचावही करायचा नाही, असेही देवेगौडा यांनी पत्रात म्हटले आहे.