फोन हॅक करून व्यावसायिकाच्या बँक खात्यावर मारला डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यावसायिकाचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून 4 लाख 20 हजार रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. घडल्याप्रकरणी खार पोलिसांनी सागर अशोक घायाळ या तरुणाला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे व्यावसायिक असून ते खार परिसरात राहतात. गेल्या आठवड्यांत तक्रारदारांना मोबाईलवर एक फोन आला. एका क्लबच्या वतीने मेंबरशिप दिली जात आहे. त्या मेंबरशिपसाठी तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवर माहिती भरून देण्यास तक्रारदारांना सांगण्यात आले. मेंबरशिपच्या मोहात तक्रारदारांनी माहिती भरून पाठवली. माहिती पाठवल्यानंतर रात्री तक्रारदारांचा मोबाईल फोन हॅक करण्यात आला. मोबाईल हॅक करून त्याच्या व्रेडिट कार्डातून 4 लाख 20 हजार रुपये काढण्यात आले. रात्री तक्रारदारांनी मोबाईल तपासला तेव्हा त्यांच्या मोबाईलवर व्रेडिट कार्डमधून पैसे काढल्याचा मेसेज दिसला. तो मेसेज पाहून तक्रारदाराना धक्काच बसला. त्याने याची माहिती बँकेला सांगून व्रेडिट कार्ड ब्लॉक केले. कार्ड ब्लॉक केल्यानंतर तक्रारदारांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली.

खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक आणि आयटी कायद्याखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून पोलिसांनी सागरला जोगेश्वरीच्या प्रेमनगर येथून सागरला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल हस्तगत केला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. फसवणुकीचे पैसे त्याने काय केले तसेच त्याच्या इतर साथीदारांचा खार पोलीस शोध घेत आहेत.