
सामना प्रतिनिधी । मुंबई
साप आणि विंचूदंशावरील संशोधन असो किंवा कर्करोग, स्टेम्ससेल्ववरील संशोधन, सर्वात आधी हाफकिनचे नाव पुढे येते. त्यामुळे ही संस्था मुंबईतील अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून गणली जाते. या संस्थेचा आता कायापालट होणार आहे. येथील वस्तुसंग्रहालयाचा विस्तार आणि विकासासाठी हाफकिन संस्था आणि टाटा ट्रस्ट यांनी संयुक्त योजना हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने दोन्ही संस्थांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला.
सह्याद्री अतिथीगृहात विस्तार आणि विकासाच्या करारासह एकूण 62 सामंजस्य करार झाले. यात 500 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचाही समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जलसंधारण आणि राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे तसेच अनेक सनदी अधिकारी उपस्थित होते. हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी तसेच टाटा ट्रस्टच्या वतीने त्यांचे सचिव आणि प्रमुख वित्तीय अधिकारी आशीष देशपांडे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱया केल्या.
कराराचा काय फायदा होणार ?
हाफकिनमध्ये अनेक विषयांवर संशोधन होते. विविध विषयांचा सखोल अभ्यास करून तसे अहवालही तयार केले जातात. या करारामुळे जीवशास्त्रीय संशोधनात देशातील पहिल्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या हाफकिन संस्थेच्या वस्तुसंग्रहालयाला जागतिक दर्जाचे विज्ञान संग्रहालय बनविण्यात येईल. विविध क्षेत्रांतील अग्रगण्य संस्थांचा या करारात सहभाग आहे. या करारातून होणाऱया संशोधनाचा 30 लाख नागरिकांना थेट लाभ मिळेल, तर 50 लाख नागरिकांना अप्रत्यक्षरीत्या लाभ होणार आहे.



























































