
>> विद्या कुलकर्णी
आदिवासी लोकांमध्ये आजही हळद्या पक्ष्याला सूर्याचे प्रतीक मानतात. त्यांच्या नाच-गाण्यामध्ये या पक्ष्याचा उल्लेख आढळतो.
उत्तराखंडात राजाजी जंगलात आम्ही मैत्रिणी सफारीतून जात होतो तेव्हा तेथे एका उंच डेरेदार वृक्षावर पिवळ्या रंगाचा पक्षी नटखट बालकासारखा उडय़ा मारत होता. क्षणभर मनात आले हा हळद्या पक्षी तर नाही ना! फांदीवर स्थिरपणे बसल्यावर लक्षात आले, दुर्मिळ असा हा ‘बुरखाधारी हळद्या’ आहे. परंतु अजूनही मला सर्वत्र आढळणाऱया हिंदुस्थानी हळद्याचे दर्शन मात्र झाले नव्हते. आश्चर्य म्हणजे माझ्या घरासमोरच त्याला पाहण्याचा योग्य आला. अर्थात पक्ष्यांची फोटोग्राफी करणाऱयांना हा अनुभव काही नवीन नाही.
हिंदुस्थानी हळद्या
हिंदुस्थानी हळद्या हे पक्षी हिंदुस्थानी उपमहाद्वीप आणि मध्य आशिया येथे आढळतात. या पक्ष्यांचे निवासस्थान पानगळीची जंगले, निम्न-सदाहरित जंगले, बागा, शेतांमध्ये असते. नराचा रंग सोन्यासारखा पिवळा धमक असून पंखांचा पिसारा काळ्या रंगाचा असतो. या पक्ष्यांची मादी फिक्कट हिरव्या रंगाची असते. डोळे लाल रंगाचे असून चोच जाड व गुलाबी रंगाची असते. चोच टोकाला थोडीशी बाकदार असते. नराच्या डोळ्यांभोवती काळा पट्टा असतो. दाट झाडांमध्ये वावरणारे हे छोटे पक्षी चटकन दिसणे कठीणच असते, परंतु त्यांच्या मंजुळ किलबिलाटाने त्यांचे अस्तित्व जाणवते. हे पक्षी साधारणतः एकेकटेच आढळतात. परंतु रात्रीचे स्थलांतर करताना मात्र मोठय़ा थव्याने करतात. उडत असताना हे पक्षी सतत वर-खाली करत असतात. या पक्ष्यांना पाण्यामध्ये पुन्हा पुन्हा डुबक्या मारावयास फार आवडते.
फळे, फुलांमधील मध व कीटक यांचे मुख्य खाद्य आहे. त्यांच्या जाड व किंचित बाकदार चोचीमुळे कीटकांना छिद्रांमधून बाहेर काढण्यास सोपे जाते. तसेच रुंद व नख्या असलेल्या पायांमुळे ते दाट पाने असलेल्या फांद्यावरही सहजपणे अन्न शोधू शकतात. हे पक्षी बेरी तत्सम फळांच्या बिया सर्वत्र पसरवण्यास मदत करतात.
या पक्ष्यांचा एप्रिल ते ऑगस्ट प्रजननाचा काळ असतो. मादी फांद्यांच्या बेचक्यात कपासारख्या आकाराचे घरटे बांधते. यांचे घरटे कोतवाल पक्ष्याच्या घरटयाजवळच असते. मादी एका वेळी 2- 3 पांढऱया रंगाची व त्यावर लालसर, तपकिरी, काळ्या रंगांचे ठिपके असलेली अंडी घालते. नर व मादी दोघेही मिळून पिल्लांचे संगोपन करतात. पिल्ले साधारण 20 दिवसांनंतर स्वतंत्र होतात. या पक्ष्यांचे आयुष्यमान 9-10 वर्षाचे असते.
बुरखाधारी हळद्या
बुरखाधारी हळद्या हे पक्षी उष्णकटिबंधीय दक्षिण आशियात, हिंदुस्थानी आणि पूर्व श्रीलंका ते इंडोनेशियात आढळतात. ह्यांचे वास्तव्य खुल्या झाडांच्या भागात तसेच शेतांमध्ये असते.नराचा रंग पिवळा व काळा असतो. मादी फिक्कट रंगाची असून डोक्याची टोपी काळी असते. खालचा भाग फिक्कट हिरव्या रंगाचा असतो. किशोरवयीन पक्षी मादीसारखेच दिसतात, मात्र त्यांच्या खालील भागावर गडद रंगाचे ठिपके असतात. डोक्याची टोपी काळी असली तरी काळा रंग खूप उठावदार नसतो. कीटक आणि फळे विशेषतः अंजीर हे यांचे आवडते खाद्य आहे. या पक्ष्यांना रासबेरी, मलबेरी, चेरी, द्राक्षे यासारखी फळे आवडतात. त्यामुळे फळ शेतकऱयांना हे पक्षी शत्रूच वाटतात.
या पक्ष्यांचा आवाज बासरीसारखा कर्णमधुर तर कधी कर्कश असून ‘यांचे उड्डाण कस्तूर पक्ष्यासारखे असून सरळ रेषेत असते.
हळद्या पक्ष्यांची मादी घरटे कुशलतेने विणते. घरटय़ाला वरच्या बाजूला 2 ते 3 इंचाचे प्रवेशासाठी भोक असते.
आदिवासी लोकांमध्ये आजही हळद्या पक्ष्याला सूर्याचे प्रतीक मानतात. त्यांच्या नाच गाण्यामध्ये या पक्ष्याचा उल्लेख आढळतो. हळद्या पक्ष्यांची मादी तिचे घरटे इतक्या कुशलतेने विणते की ते ‘प्राणी व भक्षक’ यांपासून सुरक्षित असते असा समज आहे. आपल्या पूर्वजांनी यातूनच प्रेरणा घेऊन घरे बांधण्याची कला अवगत करून घेतली असावी.
खरंच, निसर्गाने हळद्या पक्ष्याला सौंदर्य व कौशल्य भरभरून दिले आहे!!!






























































