पाकिस्तानी कोठडीत जेलरच्या मारहाणीत डोळ्याचा पडदा फाटला, हमीद अन्सारीची आपबिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पाकिस्तानी कारागृहात सहा वर्षे मरणयातना भोगणाऱ्या हमीद अन्सारीने या सहा वर्षांतली आपबिती कथन केली. आईसह हमीद गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाला. सहा वर्षांत मला खूप टॉर्चर केले. कारागृहाचा जेलर त्यांच्या मनात येईल तेव्हा मारहाण करायचा. त्याच्या मारहाणीत माझ्या डोळ्याचा पडदा फाटला होता. अटक झाली त्यावेळी मी आता पुन्हा कधीही हिंदुस्थानात परतू शकणार नाही, असे वाटत असल्याचे हमीदने सांगितले.

हमीदच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर त्याचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता. हमीदला पेशावर येथील सेंट्रल कारागृहात जमिनीखाली 15 फुटांवर असलेल्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी दिवसरात्रीचा पत्ताच नसायचा. या कोठडीत कोणतीही सुविधा नव्हती. कारागृहातील प्रत्येक दिवस माझ्यासाठी शापित होता असे सांगून हमीद पुढे म्हणाला,‘थंडीच्या मोसमात मला एक आठवडा बाहेर उभे राहण्याची शिक्षा दिली होती. माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. उभ्या उभ्या डुलकी आली तरी खूप मारायचे.’

अफगणिस्तानमार्गे पाकिस्तान
2012 साली मुंबईतील वर्सोवा भागात राहणारा हमीद नोव्हेंबर 2012 मध्ये अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात पोहोचला होता. पाकमधील कोहट येथे एका लॉजमध्ये थांबला असतानाच गुप्तचर यंत्रणेने हमीदला ताब्यात घेतले. पुढे त्याच्यावर हेरगिरीचा खटला चालविण्यात आला.

माझी फसवणूक झाली
हमीदने सांगितले की माझी फसवणूक झाली. सोशल मीडियावर एका अनोळखी मुलीशी माझी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. एकेदिवशी या मुलीने तिचे जबरदस्ती लग्न लावले जात असल्याचे मला सांगितले. मागचा पुढचा विचार न करता मी तिची मदत करण्यासाठी पाकिस्तानात गेलो. पण मला मिसगाईड करण्यात आले. मी त्या मुलीला पाकिस्तानात कधीच भेटलो नाही, असे हमीद म्हणाला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे मी आज मायदेशी परतलो आहे, असेही हमीदने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

मार्ग चुकीचा पण नियत चांगली होती
पाकिस्तानात जाण्याचा माझा मार्ग चुकीचा होता पण माझी नियत चांगली होती. त्यावेळी मी डोक्यातून नव्हे तर मनातून विचार करीत होतो. पण माझी फसवणूक झाली. माझ्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. त्यावेळी मला नकली कार्ड देण्यात आले होते. या कार्डमुळे सुटका होईल असे सांगण्यात आले. पण त्या लोकांनीच मला लष्कराच्या स्वाधीन केले.