हनुमान मूर्तीच्या जागेवरून हाणामारी, तणावानंतर मूर्ती पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हनुमानाची मूर्ती कुठे बसवायची या वादावरून बिहारमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त आहे. या हाणामारीमुळे पोलिसांनी हनुमानाची मूर्तीच ताब्यात घेतली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारच्या वैशाली जिल्ह्यात हनुमानाच्या मूर्तीवरून वाद झाला. इथल्या गौराही नावाच्या गावात हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करायचं निश्चित झालं होतं. फक्त ती नेमकी कुठे स्थापन करावी याबाबत गावात एकमत नव्हतं. याच मुद्द्यावरून गावात वाद सुरू झाला आणि दोन गटांमध्ये उभी फूट पडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी एका वादग्रस्त आणि सार्वजनिक जमिनीवर हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्या भांडणाचं पर्यवसान जातीय वादात झालं आणि दोन्ही गटांनी हाणामारी केली.

अखेर पोलिसांनी मध्ये पडत सार्वजनिक ठिकाणी देवाची मूर्ती स्थापन करण्यास मनाई असल्याचं सांगितलं. वाद अधिक वाढू नये म्हणून पोलिसांनी ती हनुमानाची मूर्ती ताब्यात घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवली. जोपर्यंत या प्रकरणाचा तोडगा निघथ नाही, तोपर्यंत ही मूर्ती पोलीस स्टेशनमध्येच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.