
पाकिस्तानविरुद्ध कोणताही खेळ नको, त्यांच्याविरुद्ध बहिष्काराचे वातावरण तापले असतानाही बीसीसीआय यूएईमध्ये आशिया कपच्या आयोजनासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पण हरभजन सिंगने देशप्रेमी भूमिका मांडताना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची रोखठोक भूमिका घेतलीय. रक्त आणि पाणी कधीही एकत्र वाहू शकत नाही. हिंदुस्थानी नागरिकांवर दहशतवादी हल्ले करणाऱया पाकिस्तानविरुद्ध सामने नकोच. त्यामुळे आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकही सामना खेळू नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
येत्या 10 सप्टेंबरपासून आशिया कपची टी-20 फटकेबाजी रंगणार असून 14 सप्टेंबरला दुबईत हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध किमान दोन ते तीन लढती होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये म्हणून दिवसेंदिवस देशात विरोध वाढत चालला आहे. असे असतानाही या स्पर्धेत तीनतीनदा लढती खेळण्याचे गणित मांडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हरभजनने आपले परखड मत मांडत आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्ध बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तो म्हणाला, सीमेवर उभा असलेला सैनिक, ज्याचा परिवार त्याला वारंवार पाहू शकत नाही, जो देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावतो. त्याचे बलिदान सर्वांत मोठे आहे. त्याच्या तुलनेत क्रिकेट सामना न खेळणे ही फार क्षुल्लक बाब आहे. सीमेवर तणाव असताना खेळणं चुकीचं आहे. सरकारचाही याच मुद्यावर ठाम दृष्टिकोन आहे रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत. तसेच हा सामनाही होऊ शकत नाही.


























































