
मध्य रेल्वेने रविवारच्या मेगाब्लॉकमध्ये ट्रॅकच्या डागडुजीबरोबरच पायाभूत कामांचा निपटारा करण्याचा धडाका सुरूच ठेकला आहे. मध्य रेल्वेने 1.3 कि.मी.च्या ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. तर पारसिक टनेलजवळ 2.6 कि.मी.च्या रूळांची डागडुजी केली आहे. तर हार्बर मार्गावरील सुमारे 2000 गोण्या भरून कचरा उचलण्यात आला आहे.
हार्बरच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी या रूळांभोवती झोपडपट्टीसदृश्य वस्ती असलेल्या पट्ट्यातून 2000 गोणी भरून कचरा काढण्यात यश मिळाले आहे. हा भागातील ट्रकवर आजूबाजूच्या वस्त्यांमधून कचरा थेट रूळांवर टाकण्यात येतो. त्यामुळे केबल जळणे तसेच गाडय़ा घसरण्याचे प्रकारही घडले आहेत. या गोण्या जेसीबी मशिनच्या सहाय्याने सहा वॅगनवर लादून येथून हटविण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
किचकट काम पार पाडले
पारसिक बोगद्यात जलद मार्गावर 2.6 कि.मी.चा रूळ बदलण्यात आला आहे. तसेच येथील अवघड क्रॉसिंगवरील 28 स्लिपर्स ‘रेल रोड व्हेईकल’द्वारे बदलण्याचे काम किचकट काम करण्यात आले. 1.4 कि.मी. मार्गाची खडी बदलण्यात आली. 16 ठिकाणी रूळांच्या जॉईंटवर वेल्डींग करण्यात आले दिवा ते दातिवली मार्गिकेची सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनची कामेही करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.


























































