हॅरिस शिल्डची ब्लॉकबस्टर फायनल आजपासून, जनरल एज्युकेशन विरुद्ध स्वामी विवेकानंद झुंज

मुंबई क्रिकेटच्या शालेय जीवनातील सर्वाधिक प्रतिष्ठsच्या 127 व्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा तीन दिवसीय अंतिम सामना जनरल एज्युकेशन अॅकेडमी आणि बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद यांच्यात ब्रेबर्न स्टेडियमवर 11 ते 13 डिसेंबरदरम्यान खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, या अंतिम सामन्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो शाळकरी विद्यार्थी येणार आहेत.

शालेय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठत असलेल्या या स्पर्धेने सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूरसारखे असंख्य हिरे हिंदुस्थानी क्रिकेटला दिले आहेत. याच स्पर्धेतून दरवर्षी शेकडो क्रिकेटपटू मुंबई क्रिकेटला लाभत असून त्यातील अनेक रणजी संघातही आपले स्थान निश्चित करत आहेत. स्पर्धेत शालेय क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून विजेत्या संघाला 10 हजारांचे रोख बक्षीसही दिले जाणार आहे. उपविजेताही 5 हजारांचा मानकरी ठरेल. तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला फॅनकोडच्या वतीने किट बॅग पुरस्कार रूपाने दिली जाणार आहे.

नीलेश कुलकर्णी करणार नाणेफेक

या स्पर्धेची नाणेफेक करण्यासाठी माजी कसोटीपटू नीलेश कुलकर्णीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर, करसन घावरी, सीसीआयच्या अध्यक्षा मधुमती लेले यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे (एमएसएसए) क्रिकेट सचिव नदीम मेमन यांनी दिली.

प्रथमच थेट प्रक्षेपण
हॅरिस शिल्डच्या इतिहासात प्रथमच अंतिम सामन्याचे फॅनकोड थेट प्रक्षेपण करणार आहे. त्यामुळे हा सामना फॅनकोडच्या अॅपवर तसेच जिओ आणि प्राइम व्हिडीओच्या सेट टॉप बॉक्सवरही पाहाता येणार आहे.

हॅरिस शिल्डच्या अंतिम सामन्यातील उभय संघ

n स्वामी विवेकानंद आं. शाळा ः अर्जुन लोटलीकर, देवांश त्रिवेदी, विरेन जाधव, हृषिकेश नाईक, यश जांबुळकर, युग असोपा, अद्वैत कांदळकर, ऋषभ गुप्ता, आरव मल्होत्रा, वेदांत निर्मल, आदित्य सोनघरे, वर्धन पटेल, अर्णव लाड, मंथन मिस्त्राr, अद्वैत डेरे, ओम शाह, सोहन सोनावणे, एहसान चव्हाण.

n जनरल एज्युकेशन अॅकेडमी ः ऋग्वेद मोरे, शार्दुल फगारे, हर्ष नाडकर, कृश उपाध्याय, तेजस नारकर, आयुश शिंदे, श्रीनिवास रामबाबु, ओम कोळी, युवान शर्मा, अनुज कोरे, सन्मित वैती, अथर्व शेळके, श्रीराम पाल, रोहन पाटील, सुमेध देसाई, नील देवळेकर, अलभ्य धुळेकर, युवराज भिंगारे.