भाजप विरोधकांचे नेते खाणारी चेटकीण, हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

राज्यात सध्या गुंडगिरी व दडपशाही मोठ्या प्रमाणावर सुरू असून सत्ताधारी भाजपकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप ही विरोधकांची नेते खाणारी चेटकीण असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

राज्यात सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी खुलेआम सुरू आहे. आजही विरोधकांना प्रचार करण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिले जात नाही. फक्त फोडाफोडी करणे आणि खोटे आरोप करणे हाच भाजपचा धंदा सुरू आहे. भाजपकडे आता निष्ठावंत पदाधिकारी उरलेले नाहीत. म्हणूनच ते काँग्रेस व इतर विरोधी पक्षांची नेत्यांना, कार्यकर्त्यांना पळवून नेत आहेत. भाजप ही विरोधकांची नेते खाणारी चेटकीण असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न महत्त्वाचे असतानाही सरकारला विकासकामांशी काहीही देणेघेणे नाही. मराठी-उर्दू, महाराष्ट्रीयन-उत्तर प्रदेशी असे वादग्रस्त मुद्दे उभे करून विकासाचे प्रश्न गायब करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील सत्ताधारी पक्ष सध्या “नुरा कुस्ती” खेळत असून एकमेकांवर टीका करत असल्याचे चित्र संशयास्पद आहे. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा भाजपने या दोघांना सत्तेतून बाहेर काढावे किंवा त्यांनी स्वतः सत्तेतून बाहेर पडावे, मगच टीका करण्याचा अधिकार राहील, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

भाजप बेताल वक्तव्य करण्यातही मागे नाही. “पुसून टाका” हा त्यांचा अजेंडा झाला आहे. विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे अस्तित्व पुसण्याचे प्रयत्न झाले. दोन शिवसेना व दोन राष्ट्रवादी तयार करून त्यांनी हेच सिद्ध केले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाच्या योजना बंद करण्याच्या मार्गावर असून लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्याकडेही भाजपने दुर्लक्ष केले आहे. आरएसएसच्या कार्यालयांमध्ये फक्त मोदी आणि अमित शहा यांचेच फोटो लावण्याचा अजेंडा असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साथ देत असल्याची टीकाही त्यांनी केली.

“भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, तमाशा बंद करायला आलेले तुणतुणे घेऊन…”, जयंत पाटील यांचा निशाणा

यंदाच्या निवडणुकीत गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून बंदुका व कोयत्यांच्या जोरावर दहशत निर्माण केली जात आहे. सोलापूर, खोपोली आणि अकोट येथे तीन जणांची हत्या झाली असतानाही सरकारला त्याचे गांभीर्य नाही. निवडणूक आयोगही पक्षपाती भूमिका घेत असून निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, अशी टीका सपकाळ यांनी केली.