
राज्य व केंद्रातील भाजपचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केले आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे; परंतु भाजपला यातही हिंदू-मुस्लिमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
भाजपचे नेते आणि मंत्री आशीष शेलार यांनी विरोधकांच्या मतदारसंघात मुस्लिमांची दुबार नावे असून त्याबाबत विरोधक बोलत नाहीत. त्यांना केवळ हिंदूंची दुबार नावे दिसतात, असा आरोप केला होता. या टीकेला सकपाळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतचोरी मुद्दा सर्वात आधी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी उघड केला. आता देशभरातील विरोधी पक्ष याप्रश्नी आवाज उठवत आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एसआयटीत न्यायमूर्तींचा सहभाग हवा
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यावेळी म्हणाले की, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन करावी. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला डॉक्टरने रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलीसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. सरकारने याप्रकरणी न्यायमूर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन केली नाही तर 10 नोव्हेंबरला वर्षा बंगल्याला घेराव घालून आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिला आहे.
            
		





































    
    























