बायकोला काळी म्हणाल तर घटस्फोट नक्की!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंदीगड

नवरा-बायकोत कित्येकदा भांडण झालं तर अनेकदा एकमेकांना काहींना काही बोललं जातं. मात्र आता रागाच्या भरात बायकोला काळी म्हणण्यापूर्वी थोडा विचार करा कारण तुमचं हे हिणवणे घटस्फोटाचं कारण होऊ शकतं. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने महेंद्रगडच्या एका महिलेने दाखल केलेल्या गैरवर्तन संबंधित खटल्यावर सुनावणी करताना घटस्फोटाची परवानगी दिली आहे. पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये सातत्याने काही कारणांमुळे वाद होत होते. जेवण न बनवण्यावरून त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. त्याचदरम्यान अनेक लोकांसमोर पतीने पत्नीच्या काळ्या रंगावरून चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप करत महिलेने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती.

महिलेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान पीडित पत्नीने तिच्यासोबत घडलेलं गैरवर्तन पुराव्यानिशी सिद्ध केलं. आपल्याला ‘काली-कलुटी’ म्हटल्याचे बायकोने दिलेले कारण न्यायालयाने ग्राह्य धरले आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे हे पीडित महिलेला मानसिक आणि शारीरिक स्तरावर त्रस्त करण्यात आल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

न्यायमूर्ती एमएमएस बेदी आणि न्यायमूर्ती गुरविंदर सिंग गिल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. यावेळी महेंद्रगडच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात दिलेला निकाल उच्च न्यायालयाने रद्द केला. महिलेने तिच्यासोबत झालेले गैरवर्तन हे पुरावा सादर करून सिद्ध केले. त्यामुळेच एखाद्या महिलेने सासरचा त्याग करून माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर तिने कोणत्या परिस्थितीत हे पाऊल उचलले हे जाणून घेणे आवश्यक असते. तसेच या प्रकरणात महिलेसोबत गैरवर्तन आणि क्रूरता झाल्याचे सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटलं आहे.