याकूबसाठी मध्यरात्री दरवाजे उघडता मग राम मंदिरासाठी तारीख पे तारीख का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, हरयाणा

हरयाणातील भाजपचे मंत्री अनिल वीज राम मंदिराची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलल्याने भडकले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याकूब मेमनतर्फे फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी केलेल्या याचिकेवर मध्यरात्री दरवाजे उघडले होते. या घटनेची आठवण करून देत वीज म्हणाले की “याकूब मेमनसाठी रात्री 12 वाजता दरवाजे उघडायचे असोत किंवा राम मंदिराचा प्रश्न ज्याकडे देशातील जनता मोठ्या आशेने सर्वोच्च न्यायालयाकडे बघते आहे त्याला तारखेमागे तारीख देणं असो ही तर सगळी सर्वोच्च न्यायालयाची मर्जी आहे”

राम मंदिर बनवणारच असं आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजपसाठी हाच मुद्दा आता डोकेदुखी बनला आहे. मंदिर बनवण्याचं त्यांचं आश्वासन म्हणजे अनेक जुमल्यापैकी एक जुमलाच होता अशी टीका हिंदुत्ववादी संघटना आणि विरोधकांनी करायला सुरुवात केली आहे. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांचे आयोध्येत भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प न्यायालयीन लढय़ात अडकल्याने भाजपची मोठी गोची झाली आहे. सोमवारी रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी नवीन वर्षात जानेवारीनंतर होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करीत तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. न्यायालय निर्णय देईल तेव्हा देईल मात्र तोपर्यंत स्पष्ट बहुमत असलेल्या मोदी सरकारने अध्यादेश आणून राममंदिर उभारावं अशी मागणी शिवसेनेसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.