
‘HR88B8888’ हा नंबर प्लेट क्रमांक अधिकृतपणे देशातील सर्वात महागडा कार नोंदणी क्रमांक ठरला आहे. हा क्रमांक बुधवारी हरियाणामध्ये तब्बल १.१७ कोटी रुपयांना विकला गेला.
हरियाणामध्ये व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर प्लेट्ससाठी दर आठवड्याला ऑनलाइन लिलाव आयोजित केले जातात. बोली लावणारे शुक्रवार सायंकाळी ५ ते सोमवार सकाळी ९ वाजेपर्यंत त्यांना हवा असलेल्या क्रमांकासाठी अर्ज करू शकतात. आणि त्यानंतर बोली लावण्याचा खेळ सुरू होतो, ज्याचे निकाल बुधवार सायंकाळी ५ वाजता घोषित होतात. हा लिलाव fancy.parivahan.gov.in या अधिकृत पोर्टलवर पूर्णपणे ऑनलाइन होतो.
या आठवड्यात बोलीसाठी असलेल्या सर्व क्रमांकांमध्ये ‘HR88B8888’ या नोंदणी क्रमांकासाठी सर्वाधिक – एकूण ४५ अर्ज प्राप्त झाले. याची मूळ बोली किंमत ५०,००० रुपये इतके निश्चित करण्यात आली होती, जी प्रत्येक मिनिटाला वाढत गेली आणि सायंकाळी ५ वाजता १.१७ कोटी रुपये या विक्रमी किमतीवर स्थिरावली. दुपारी १२ वाजता या क्रमांकासाठीची बोली किंमत ८८ लाख रुपये होती.
गेल्या आठवड्यात, ‘HR22W2222’ या नोंदणी क्रमांकाला ३७.९१ लाख रुपये इतकी किंमत मिळाली होती.
HR88B8888 चं वैशिष्ट्य काय आहे?
HR88B8888 हा वाहन क्रमांक किंवा व्हीआयपी क्रमांक आहे, जो बोलीद्वारे प्रीमियम किमतीत खरेदी केला गेला आहे.
HR ही अक्षरे राज्याचा कोड आहेत, यावरून वाहन हरियाणात नोंदणीकृत असल्याचे स्पष्ट होते.
88: हे हरियाणातील विशिष्ट प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) किंवा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करते, जिथे वाहन नोंदणीकृत आहे.
B: हा विशिष्ट RTO मधील वाहन मालिकेचा कोड (Vehicle Series Code) दर्शवण्यासाठी वापरला जातो.
8888: हा वाहनाला दिलेला चार-अंकी नोंदणी क्रमांक आहे.
ही नंबर प्लेट विशेष आहे, कारण इंग्रजीतील ‘B’ हे अक्षर मोठ्या आकारात (Uppercase) ‘8’ सारखे दिसते आणि यात फक्त एकच अंक (8) पुन्हा पुन्हा वापरला गेला आहे, ज्यामुळे हा क्रमांक आठ (8) या अंकाची एक सिरिज असल्यासारखा दिसतो.
केरळच्या व्यक्तीने ४६ लाखांची नंबर प्लेट खरेदी केली तेव्हा…
या वर्षाच्या सुरुवातीला, एप्रिलमध्ये, केरळमधील टेक अब्जाधीश वेणू गोपाळकृष्णन यांनी त्यांच्या लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मेन्टे (Lamborghini Urus Performante) साठी “KL 07 DG 0007” ही व्हीआयपी नंबर प्लेट ४५.९९ लाख रुपये इतक्या किमतीत खरेदी केली होती. या क्रमांकासाठीची बोली २५,००० रुपयांपासून सुरू झाली होती आणि ती वाढत विक्रमी अंतिम किमतीवर पोहोचली.
हा ‘0007’ क्रमांक, जो प्रसिद्ध जेम्स बॉन्ड कोडची आठवण करून देतो, ज्यामुळे केरळच्या लक्झरी ऑटोमोबाइल क्षेत्रात गोपाळकृष्णन यांची एक नवीन ओळख तयार झाली आहे.

























































