
भाजपची नेतेमंडळी सातत्याने मला कसे थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. त्यांनीच किरीट सोमय्यांचा टूल म्हणून वापर केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या जे काही आरोप करतायत त्यामागे भाजपचे फार मोठे षडयंत्र आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले आहे. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.
चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली
चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी चिंतेचा विषय म्हणजे, ते ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी भाजप भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केलाय, तर हसन मुश्रीफ यासाठी मुख्य कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती. त्यावेळी मी त्यांना पवार एके, पवार असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची धाड टाकली. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केले, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.
कुणाचा तरी वापर करून बदनामी करू नका
किरीट सोमय्या सातत्यानं सांगतात की, मी ही कागदं काढतो आणि फडणवीसांकडे घेऊन जातो. पुढे ते सांगतात तसंच मी करतो. चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थानं लढावं, असं कुणाचा तरी वापर करून बदनामी करून, माझ्या कुटुंबियांची बदनामी करून त्यांना काहीही मिळणार नाही. माझ्यावर करण्यात येत असलेले सगळे आरोप खोटे आहेत. बिनबुडाचे आहेत, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
शरद पवार यांचे नाव घेण्याची लायकी आहे का?
मला सोमय्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तक्रार केली आहे. मग तपास यंत्रणा तपास करतील, तुम्ही कशाला पर्यटनाला जाता? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज असे म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? यावर आक्षेप घेत मी उच्च न्यायालयात जाणार आहे. हे न्यायाधीश झाले का? तुम्हाला सुपारी दिलीये तर तुम्ही काम करा तुमचे, तक्रार करा. तपास यंत्रणांना तपास करू द्या. तुम्ही बदनामी का करत आहात? आमच्यावर आत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. शरद पवारांचा काय संबंध आहे यात? त्यांचे नाव का घेतायत? त्यांचे नाव घ्यायची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचे नाव घेतायत हे. त्यांना रोखण्यासाठी मी उच्च न्यायालयात जाणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
सोमय्या यांना कराडमध्ये ताब्यात घेतले
कराड : सोमय्या हे रेल्वेने कोल्हापूरला निघाले असता सोमवारी पहाटे 4.30 वाजता कराड रेल्वे स्थानकावर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस बंदोबस्तात शासकीय विश्रामगृहात नेले. त्यानंतर सकाळी त्यांची बंदोबस्तात मुंबईकडे पाठवणी करण्यात आली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ समर्थकांनी सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांनी सोमय्या यांना नोटीस काढून कोल्हापूर जिह्यात येण्यास मज्जाव केला होता.

























































