विजय जोशी । नांदेड
चंडी पाठसह नांदेडच्या सचखंड श्री हजूर साहिब येथे दसऱ्याच्या नवरात्र उत्सवाची शुक्रवारी समाप्ती झाली. दुपारी तीन वाजता सचखंड श्री हजूर साहिब येथून मुख्य जत्थेदार संत बाबा श्री कुलवंतसिंघजी यांच्या प्रार्थनेनंतर नगर परिक्रमा निघाली. सायंकाळी सहा वाजता शहरातील महावीर चौक येथून ‘जो बोले सो निहाल सत श्री अकाल’च्या जयघोषात पारंपारिक हल्लाबोल साजरा झाला. देशभरातून हजारो शिख भाविकांनी दसरा हल्लाबोल मिरवणुकीत सहभाग घेतला.
श्री गुरुगोविंदसिंघजी यांनी दसरा महोत्सवाच्या आयोजनात चंडी पाठची परंपरा प्रत्यक्षात आणली त्यानुसार रोज रात्री एक तास सचखंड श्री हजूर साहिब येथे हा चंडी पाठ ऐकण्यासाठी भाविक मंडळी गर्दी करतात. हा पाठ नवरात्रातील दहा दिवस चालतो. दसऱ्याच्या दिवशी या चंडी पाठ समाप्तीची तयारी होते आणि या समाप्ती सोहळ्यात असंख्य भाविक सहभागी होतात. दुपारी तीन वाजता सचखंड श्री हजूर साहिब येथे मुख्य जत्थेदार व इतर पंचप्यारे साहिबान हे प्रार्थना करतात आणि त्यानंतर निशाण साहिब घेऊन मिरवणूक निघते. या मिरवणुकीत यंदा बाहेरुन आलेल्या संतांमध्ये बीदीचंद दलाचे जत्थेदार संत बाबा श्री अवतारसिंगजी हे या मिरवणुकीत सहभागी झाले. बाबा अवतारसिंघजी आपल्यासोबत हाती, घोडे असा मोठा लवाजमा घेऊन दसरा महोत्सवात सहभागी होतात. मिरवणुकीत अनेक यौध्दा आपल्या गदका (युध्दकला) प्रदर्शन करतात. हळूहळू ही मिरवणूक पुढे सरकत राहते. अनेक भाविक निशाण साहिबचे पूजन करुन दर्शन घेतात. सचखंड श्री हजूर साहिबचे जत्थेदार संत बाबा श्री कुलवंतसिंघजी यांनी गुरुव्दारा चौरस्त्यापर्यंत या मिरवणुकीत सहभाग घेतला. हळूहळू ही मिरवणूक महावीर चौकात आली. तेथे प्रार्थना करुन ‘जो बोले सो निहाल सत श्री अकाल’च्या जयघोषात हल्लाबोल झाला. तेथून ही मिरवणूक जवळपास धावत गुरुव्दारा म्युझिमपर्यंत गेली. तेथे मिरवणुकीतील सर्व सहभागी लोकांसाठी चहापाणाची सोय होती.
त्यानंतर ही मिरवणूक पुढे हिंगोली गेट, बाफना चौक, जुनामोंढा टॉवर, गुरुव्दारा चौरस्ता आणि सचखंड येथे रात्री दहा वाजतापर्यंत पोहोचते. दशमगुरु श्री गुरुगोविंदसिंघजी यांनी सुरु केलेली ही प्राचीन परंपरा आजही नांदेडमध्ये त्याच पध्दतीने साजरी होते. या दहा दिवसाच्या दसरा मेळाव्यात जवळपास हजारो शिख भाविक देशभरातून सहभागी झाले होते. मिरवणुकीतील सर्व व्यवस्था पाहताना पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



























































