
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महापालिकेला दिलासा दिला. देवनार येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्याची मुभा देण्याची पालिकेची मागणी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठाने मान्य केली. त्यामुळे डिसेंबर 2019 पर्यंत देवनार डंपिंग ग्राऊंडवर पालिकेला घनकचरा गोळा करता येणार असून हायकोर्टाने प्रशासनाला ही शेवटची मुदतवाढ दिली आहे.
मुंबईतील डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर मंगळवारी सुनावणी झाली. कांजुरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा ताण कमी करण्यासाठी देवनार येथील डंपिंग ग्राऊंडवर 450 मेट्रिक टन कचरा गोळा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणारा अर्ज पालिका प्रशासनाकडून ऍड. अनिल साखरे यांनी खंडपीठासमोर सादर केला. देवनार डंपिंग ग्राऊंडवरील केवळ 70 हेक्टर जमिनीचा याकरिता उपयोग केला जाणार आहे व त्या जमिनीवर 450 मेट्रिक टन कचरा गोळा केला जाणार आहे असे पालिकेने कोर्टाला सांगितले.
- न्यायमूर्तींनी पालिकेचा युक्तिवाद ग्राह्य धरत देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचरा गोळा करण्यासाठी पालिकेला डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ दिली व ही मुदतवाढ देतानाच ही शेवटची संधी असल्याचेही प्रशासनाला बजावले.
कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेला जागा द्या
एप्रिल 2013 साली मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला देवनार व मुलुंड येथील डंपिंग ग्राऊंड तीन महिन्यांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु पालिकेला जागेअभावी हे डंपिंग ग्राऊंड बंद करता येत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार मुदतवाढ मागितली जात आहे. अखेर खंडपीठाने याची दखल घेत पालिका प्रशासनाला डंपिंग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पावले उचलण्याचे आदेश राज्य सरकारला दिले व सुनावणी तहकूब केली.



























































