पीटर मुखर्जीला जामीन नाही; पण उपचाराला परवानगी

50

सामना ऑनलाईन । मुंबई

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज पुन्हा नकार दिला. मात्र कार्डियाक रेहाब थेरपीसाठी पीटरने एशियन हार्ट रुग्णालयात उपचार घेण्याची मागितलेली परवानगी न्यायमूर्तींनी मंजूर केली. या वैद्यकीय तपासणीला जाताना सोबत पोलीस तसेच कार्डियाक स्पेशालिस्टना आवर्जून घेऊन जावे असेही न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पीटर मुखर्जीची बायपास सर्जरी झाली असून तुरुंगात संसर्गामुळे आजारपण बळावण्याची शक्यता असल्याने आपल्याला सोडून देण्यात यावे यासाठी कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. सीबीआय विशेष कोर्टाचे न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी 4 एप्रिल रोजी जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर छातीत दुखत असल्याने 17 मार्च रोजी मुखर्जीला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आजारपणाचे कारण देत पीटर मुखर्जी याने सुटकेसाठी आता मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती रियाज छागला यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी सीबीआयच्या वतीने सीनियर काऊन्सिल ऍड. खान यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. तर याचिकाकर्त्यांनी जे. जे. रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने वांद्रय़ातील एशियन हार्ट सेंटर येथे दररोज नियमित तपासणीसाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती कोर्टाला केली. न्यायमूर्तींनी याची दखल घेत 26 सेशन्सकरिता पीटरला परवानगी देण्याचे मान्य केले व सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या