आशा स्वयंसेविका म्हणून कामाला लावण्याचे आमीष, 20 हजारांची लाच घेताना आरोग्य अधिकाऱ्याला पकडले

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथल्या आरोग्य अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आशा स्वयंसेविका म्हणून कामाला लावतो असे आश्वासन या अधिकाऱ्याने दिले होते. त्यासाठी त्याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ .नरेंद्र आडे यांनी आधी एक लाख रुपयांची लाच मागितली होती, मात्र तडजोड केल्यानंतर ही रक्कम 20 हजार करण्यास आडे याने होकार दिला होता. ही रक्कम स्वीकारत असताना त्याला पकडण्यात आले. काळी (दौ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा लावून आडे याला अटक करण्यात आली.

आशा स्वयंसेविका होण्यासाठी आपल्याकडे पात्रता असतानाही लाच मागितली जात असल्याने महिला निराश झाली होती. तिने हा प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला असता त्याने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, अंमलदार अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, सचिन भोयर, महेश वाकोडे, सविता राठोड, चालक संजय कांबळे यांच्या पथकाने सापळा रचून आडे याला अटक केली. आडे याच्याविरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्याची कारकीर्द ही वादग्रस्त राहिली असून आडे याने बोगस बंगाली डॉक्टरांना त्याने मोकळे रान दिले होते असा आरोप केला जातो. या बोगस बंगाली डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ग्रामीण भागामध्ये आशा स्वयंसेविका हे पद मानाचे मानले जाते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबविण्यात येते. आशा स्वयंसेवकाकडून गावातील आरोग्य विषयक समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जातो.