भाविकांना गर्दीत ढकलू नका; मंदिरे उघडण्याची मागणी चुकीची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे ही सध्याची गरज असून सरकारने मंदिरे सुरू करून भाविकांना गर्दीत ढकलू नये, अशी मागणी वारकरी प्रबोधन महासमितीने केली आहे. मंदिरात रांगा लावण्यापेक्षा भाविकांनो, घरच्या देवासमोरच हात जोडा, भजन करा, असे आवाहनही महासमितीने केले आहे.

मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यात सुरू असलेली आंदोलने चुकीची असून राजकीय पक्षांनी धर्मगुरू बनून जनतेची दिशाभूल करू नये, असे मत वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष तसेच वारकरी महामंडळाचे कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. शहरांपासून गावागावांपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. या आजारांमुळे सामान्यांपासून अनेक धर्मगुरूंचाही बळी गेला आहे. महाराष्ट्रासह अख्खा देश कोरोनामुळे संकटात असताना धर्मगुरूंनी जनतेला आधार देण्याऐवजी राजकीय पक्षांच्या मागे धावणे चुकीचे आहे, अशी टीकादेखील रामेश्वर महाराज शास्त्री यांनी केली. मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणे म्हणजे अध्यात्माच्या नावावर स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार असून यामुळे समाजात फक्त अशांतताच पसरेल, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशात अजूनही मंदिरे बंदच
उत्तर प्रदेशातही अनेक भव्य मंदिरे आहेत. मात्र कोरोनामुळे ही मंदिरे बंद आहेत. मंदिरे सुरू करण्याबाबतचा कुठलाही निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी त्या राज्यात आंदोलन का होत नाही, असा सवालही रामेश्वर महाराज शास्त्री यांनी केला आहे.