आरोग्य सेवा घरोघरी पोहोचणार, संकल्प निरोगी महाराष्ट्राचा

फास्ट फूडच्या जमान्यात पिझ्झा, बर्गर अगदी वेळेत घरपोच येतात. त्याच धर्तीवर आरोग्य सेवा राज्यातील जनतेच्या घरोघर येणार आहे, असे सांगतानाच निरोगी महाराष्ट्र हाच आमचा संकल्प आहे, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी ठाणे येथे केले.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या चार दिवसीय  वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे डिजिटल उद्घाटन काशीनाथ घाणेकर सभागृहात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. राज्याच्या 16 जिह्यांतील दुर्गम भागात एकाच वेळी चार दिवस हे शिबीर होणार असून याचवेळी गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील अद्ययावत सिटी स्पॅन सेंटरचे अनावरणही करण्यात आले.

ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, नांदेड, अमरावती, धुळे, पुणे, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नाशिक, नंदुरबार, जळगाव, नगर या सोळा जिह्यांतील दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना तज्ञ डॉक्टरांची आरोग्य सेवा थेट घरपोच मिळणार आहे. या ठिकाणी  तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासण्या, वैद्यकीय चाचण्या, मोफत औषधे व उपचार, आवश्यक त्या शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा आदी सुविधा या शिबिराच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. शिवसेना नेते व राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोफत शिबिराचा लाभ लाखो नागरिक व विद्यार्थी घेतील आणि ही योजना समाजातील अखेरच्या घटकापर्यंत पोहचेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. निरोगी महाराष्ट्राचा संकल्प हाच आमचा ध्यास असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपपुमार व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त डॉ. अनुप पुमार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, पांडुरंग बरोरा, विलास तरे, महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, माजी महापौर संजय मोरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पैलास पवार आदी उपस्थित होते.

शेकडो विद्यार्थ्यांची तपासणी 

या शिबिरात पहिल्याच दिवशी ठाणे पालिका शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. पौष्टिक आहार, सिकलसेल, ऍनेमिया याबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे.  शिबिराच्या पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी करून दुसऱया व तिसऱ्या दिवशी रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहेत, तर चौथ्या दिवशी या रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या