
संपूर्ण राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सीमा तपासणी नाका खारेपाटण चेक पोस्ट येथे आजपासून आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. खारेपाटण चेकपोस्टला येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी पोलीस यंत्रणेकडून केली जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा बाधित होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या आदेशाने जिल्ह्यात सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचे प्रशासकीय निर्देश देण्यात आले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे.
खारेपाटण तपासणी नाका येथील आरोग्य पथकाला आज खारेपाटण – तळेरे मंडल अधिकारी मंगेश यादव यांनी भेट देऊन पाहणी केली. महसूल प्रशासन व आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून खारेपाटण येथे सध्या बाहेरून येणाऱ्या नागरिक व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. खारेपाटण येथील तपासणी पथकात महसूल कर्मचारी व प्राथमिक शिक्षक यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. एकूण तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी काम करणार आहेत. खारेपाटण पोलीस कर्मचारी पराग मोहिते, सुयोग पोकळे यांच्या समवेत आरोग्य सेवक सागर खोत, आरोग्यसेविका मनीषा डोर्लेकर आदी कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून खारेपाटण चेकपोस्ट येथे कार्यरत होते.






























































