पक्ष आणि चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात आवश्यक कागदपत्रांच्या आधारे, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप पांडे व अरुण गोयल या तिघांच्या पीठापुढे सुनावणी होत आहे. याआधी 10 जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात आली होती.

10 जानेवारी रोजी तब्बल दोन तास ही सुनावणी चालली होती. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल व देवदत्त कामत यांनी तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली होती. पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार असे यावेळी सांगण्यात आले होते.

आज सुरू झालेल्या सुनावणीसाठी शिवसेना सचिव अनिल देसाई व आमदार अनिल परब उपस्थित झाले आहेत.

याआधी झालेल्या सुनावणीवेळी ‘शिवसेनेशी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळविलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या विधानसभा सदस्यत्वाच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचा यासंदर्भातील निर्णय येईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हाबाबत कोणतीही सुनावणी घेऊ नये किंवा निर्णय करू नये. सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात सोळा आमदार अपात्र ठरवले तर निवडणूक आयोगाचे हसे होईल’, असे निदर्शनास आणून देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज जोरदारपणे बाजू मांडली होती.