राष्ट्रवादी कोणाची? सुनावणी पूर्ण, निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला

राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी आणि पक्षचिन्ह कुणाचे यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निकाल राखून ठेवत एका आठवडय़ात लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

मिंधे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत राष्ट्रवादी पक्ष आणि घडय़ाळ या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला नोटीस बजावून सुनावणी घेतली. यासंदर्भात मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा सुरू असलेला युक्तिवाद अखेर आज संपला. अजित पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी, तर शरद पवार यांच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.

एकीकडे सांगता की, 2019 पासून वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही पद घेता त्यावेळी काही बोलत नाहीत. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो, असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला.

हे त्यांच्या हरण्याचे द्योतक – अभिषेक मनु सिंघवी

निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाने संघटनेचे मत विचारात घेऊ नका, अशी भूमिका मांडली आहे. म्हणजे हे स्पष्ट होते की, त्यांच्याकडे संघटना नाही. हे त्यांच्या हरण्याचे द्योतक असल्याचे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.