
सामना प्रतिनिधी । हिंगोली
जिल्हयात मागील आठ ते दहा दिवसापासुन गायब झालेल्या पावसाने शुक्रवारच्या रात्री साडेआठच्या सुमारास मेघ गर्जनेसह जोरदार हजेरी लावली. जिल्हयातील ३० महसुल मंडळात पाऊस झाला. या पावसामुळे पिकाना जिवदान मिळाले असुन रखडलेल्या पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधु नदी दुधडी भरून वाहत आहे.
जिल्हयांतील पाच तालुक्यात आता पर्यत एकसारखा पाऊस पडला नव्हता. मात्र २२ जुन रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग चांगलाच खुश झाला आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पुर आला होता. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ३५३ मि.मी पाऊस पडला असून २२ जुन रोजी सरासरी ४७.३९ मी.मी.पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची २३.०६ टक्कवारी नोंद झाली आहे. शेतकरी राजा आता शेतीच्या कामात मग्न राहणार आहे. दरम्यान २३ जुनच्या पहाटे साडेपाच वाजता जोरदार मुसळधार पाऊस पडला. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. या पावसामुळे बोरवेल-विहीरींना पाणी आले आहे. कयाधु नदी दुधडी भरून वाहत आहे. तसेच जिल्ह्यातील ओढे, नाले देखील वाहत आहेत.





























































