साताऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहर व तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज सायंकाळनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाप्रमाणे आज जिल्ह्यातील वातावरणाने कूस बदललेली दिसली. जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरणामुळे अंधारून आल्याचे चित्र दिसत होते. हवेतील उष्मा वाढला होता. सायंकाळी सातनंतर मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सातारा, कराड, भुईंज, खंडाळा, वाई, पाचगणी, मेढा, कोरेगाव, तसेच पाटण परिसराला या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.

या पावसाच्या तडाख्याचा रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेल्या पिकांना फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या शाळू, गहू, हरभरा ही पिके काढणीस आली आहेत. काही ठिकाणी काढणी सुरू आहे. पावसामुळे काढून झालेली ज्वारीची कणसे काळी पडण्याचा धोका आहे.