
मुंबई परिसरात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) इंजिनीयरिंग सेवेच्या परीक्षेला बसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची रविवारची परीक्षा हुकली आहे. पावसामुळे रेल्वेसेवा बंद झाली. त्यातच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचताच आले नाही.
यूपीएससीने रविवारी इंडियन इंजिनीयरिंग सेवेच्या परीक्षेचे आयोजन केले होते. मुंबईतील काही केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार होती. मात्र शनिवारी रात्रभर मुंबईला पावसाने झोडपून काढले. यामुळे अनेक भागांत पाणी साचले तर रेल्वेसह अन्य सार्वजनिक वाहतूकही खोळंबली होती. यामुळे उमेदवारांना परीक्षेला पोहचता आले नाही. या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत असून याप्रकरणी युवासेनेचे मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, राजन कोळंबेकर यांनी शिवसेनेचे राज्यसभा सदस्य खासदार अनिल देसाई यांना पत्र लिहून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. याबाबत सोमवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी करणार असल्याचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.































































