
कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर कमी होत नसल्याने, महापुराची स्थिती गंभीर बनत आहे. राधानगरी धरण पुर्ण भरण्यास अजुन 5 ते 6 फुट कमी आहे. धरण भरल्यास, स्वयंचलित दरवाजे सुरू होऊन विसर्ग होऊन, नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. सध्या दर तासाला पंचगंगेच्या पातळीत अर्धा फूट वाढ होत असून, सकाळी 9 वाजता 48.1 इंच पातळी झाली होती. रात्री बारा वाजताच पंचगंगेने 43 फुटाची धोका पातळी ओलांडली आहे.
दरम्यान मध्यरात्रीपासूनच शहरातील कुंभार गल्ली, व्हिनस कॉर्नर आदी परिसरात पुराचे पाणी घुसले आहे. पंचगंगेला मिळणारा जयंती नदी (नाला) पुलावर पाणी आल्याने, हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तर पुराचा वेढा पडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बऱ्याच भागातील रस्ते बंद असून,विद्युत पुरवठा व दूरध्वनी यंत्रणा खंडित झाली आहे. जिल्ह्यात पुराने बाधित भागातील नागरिक व जनावरांना बाहेर काढणे, त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे व आवश्यक ती मदत उपलब्ध करुन देण्याचे काम एनडीआरएफच्या टीम व प्रशासनाच्या वतीने रात्रभर सुरू आहे.
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर जाणारा रस्ता पुन्हा एकदा खचला. यापूर्वी 2019 मध्ये आलेल्या महापुरात भूस्खलन होऊन रस्ता खचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरात हा रस्ता दुरुस्त केला होता. यंदा अतिवृष्टीत हा रस्ता पुन्हा खचल्याने किल्ल्याचा संपर्क तुटला आहे.

पुरात अडकलेल्या दोन बसमधील प्रवाशांची सुखरूप सुटका
कोल्हापूर- पन्हाळा मार्गावर, रत्नागिरीला निघालेली कर्नाटक राज्य परिवहनची बस राजपूतवाडी जवळ पाण्यात अडकली होती. बसमधील पुरुष, महिला व लहान मुले अशा एकूण 25 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांना यश आले आहे.ही बस पाण्यात बुडाली आहे.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे पांगीरे, ता. भुदरगड येथे पुलावर नाशिक येथे निघालेली प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलर अडकली होती. यात 11 जण अडकले होते. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
कागल-निपाणी हायवे बंद
सांगली – कोल्हापूर बायपास रोडवर उदगाव येथील ओढ्याला बॅक वॉटरमुळे पुराचे पाणी आले असून ब्रिज वर चार फूट पाणी आल्याने, बॅरिगेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.
गारगोटी कडून गडहिंग्लज कडे जाणाऱ्या मार्गावरील पालघाट याठिकाणी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या आहेत.पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दगड-धोंडे, खडक घाटातील रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झालेला आहे. डोंगरातील पाण्याचे मोठे लोंढे घाटातील रस्त्यावर आडवे वाहत आहेत. गारगोटी – कोल्हापूर, गारगोटी – गडहिंग्लज, गारगोटी – कडगाव हे सर्व मार्ग बंद झाले. गारगोटीचा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर भागाशी संपर्क खंडित झाला आहे. मागुंर फाट्यावर पाणी आल्याने,पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल-निपाणी मार्ग बंद करण्यात आला.































































