
सोलापूर जिल्हय़ात झालेला रेकॉर्ड ब्रेक पाऊस, सीना-भोगावतीसह उपनद्यांना आलेला महापूर, यामुळे जिह्यातील शेतकरी व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जिह्यातील आठ तालुक्यांतील पावणेचार लाख शेतकऱयांना फटका बसला असून, साडेतीन लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. जवळपास 115 गावे बाधित झाली असून, मोहोळ व माढा तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे.
सोलापूर जिह्यात यंदाच्या वर्षी गेल्या 70 वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक पाऊस आणि महापूर आला आहे. सप्टेंबर अखेर 145 टक्के पाऊस झाला आहे. जिह्याची सरासरी आहे 481 मि.मी. पाऊस. अहिल्यानगर व धाराशिव जिह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सहा तालुक्यांतून वाहणारी सोनानदी व भोगावती आणि उपनद्यांना महाप्रलयकारी पूर आला. त्यामुळे माढा, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सांगोला, बार्शी तालुक्यांतील सुमारे साडेतीन लाख हेक्टर शेतातील पिके व माती पुरामुळे अक्षरशः खरडून गेली आहे. अनेक ठिकाणी 10 फूट पिके पाण्याखाली बुडाली आहेत. याचा फटका बागायत, कोरडवाहू व जिरायती शेती असलेल्या 3 लाख 60 हजार 487 शेतकऱयांना बसला आहे. एक हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. सहा तालुक्यांतील 188 गावांना पुराने, तर 27 गावांना अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. आजही तिऱहे, तेलगाव, वाकावसारखी गावे पाण्यात बुडालेली आहेत. नागरी वस्त्यांचे व पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार 156 लहान-मोठे पशू आणि 18041 कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. सीना व भोगावती व त्यांच्या उपनद्यांमुळे हा महापूर आलेला असताना, सोलापूर शहरातील आदिला नदी व हिप्परगा तलावातील ओव्हरफ्लो पाण्यामुळे जवळपास 40 ते 50 वस्त्या व नगरांचे नुकसान झाले आहे. पूरस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता मदतीकरिता एनडीआरएफ 2, आर्मीची 1 तुकडी आणि रायगड, पुणे, सांगली, कोल्हापूर येथील 9 पथकांनी प्रयत्न केले.
या महापुरात माढा तालुक्यातील वाकाव गावचे प्रचंड नुकसान झाले आहे. सीना नदीच्या सुमारे एक किलोमीटर दूर असलेल्या वाकाव गावातील घरे आणि शेती अद्यापही 8 ते 10 फूट खोल पाण्यात आहे. गावातील घरे, शेती व पशुधन अक्षरशः पाण्यामुळे खरडून गेले आहे. माणकोजी घोसाडे या शेतकऱयाचा 20 एकर ऊस पाण्याखाली असून, 50 ते 60 जनावरे वाहून गेली आहेत. पेरू आणि ऊसासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील शेतातील माती 4-5 फूट वाहत गेली आहे. अद्यापही या गावात मदत कार्य पोहोचलेले नाही. संपूर्ण गाव स्थलांतरित झाले असून, गावकरी एकमेकांच्या मदतीने दिवस काढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांत सीना नदीला तिसऱयांदा महापूर आल्याने शेतकरी व ग्रामस्थ प्रचंड चिंतेत आणि भयभीत झाले आहेत.