
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका वन्यप्राण्यांनाही बसला आहे. या मुसळधार पावसादरम्यान वरोरा तालुक्यातील चारगाव येथे एक वाघ गावात आला. या वाघोबाने गोठ्यात आसरा घेतला. गोठ्यात वाघ दिसल्याने खळबळ उडाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत.
पावसामुळे जंगलात जाऊ न शकलेला आणि पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एक वाघ शेतशिवाराच्या माध्यमातून गावाकडे आला. हा वाघ संजय लाखे यांच्या जनावरांच्या गोठ्यात शिरला. वाघ दिसताच गावकऱ्यांनी आरडाओरड केली. वाघ चारा ठेवलेल्या ठिकाणी चढून बसला असून त्याला पकडण्यासाठी ताडोबाची टीम गावात तैनात झालेली आहे.



























































