कुडाळात पूरसदृश्य परिस्थिती, नदीकिनारील घरांना धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

कुडाळ तालुक्याला बुधवारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. भंगसाळ नदी दुधडी भरून वाहत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूराचे पाणी डॉ.आंबेडकर नगरापर्यंत शेतमळ्यात आल्याने येथील घरांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच कुडाळसह पावशी, कविलकाटे, सरंबळ, चेंदवण, वेताळबांबर्डे, पणदूर येथे नदीकिनारील भागात पुराचे पाणी शिरले आहे.

कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारीही मुसळधार पावसाने कहरच केला. माणगांव खो-यालाही मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. आंबेरी कर्ली नदीसह शिवापूर, दुकानवाड, वसोली भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तालुक्यात कोसळत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. भंगसाळ नदीला पूरस्थिती निर्माण होऊन पुराचे पाणी लगतच्या शेतमळ्यांमध्ये पसरले होते. येथील डॉ.आंबेडकर नगरापर्यंत पुराचे पाणी आल्याने तेथील काही घरांना धोका निर्माण झाला. वेताळबांबर्डे हातेरी व हुमरमळा पिठढवळ नदीलाही मोठा पूर आला. सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. कुडाळच्या आठवडा बाजारालाही पावसाचा मोठा फटका बसला. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे वीज, दूरध्वनी व वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पडझड होऊन नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.