
अतिवृष्टीचा हैदोस जळकोट तालुक्यात अद्याप सुरूच असून सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा डोंगरी तालुका जलसंकटात बुडाला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्याने तालुक्यातील बहुतांश रस्ते बंद करण्यात आले आहेत. तिरुका, मरसांगवी, बेळसांगवी येथे तिरू नदीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत. बेळसांगवी येथे शेतातील पाईपलाईन व विद्युत मोटारी वाहून गेल्याने आणखी नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहे. त्यामुळे किती सोसायचे? शेती कशी करायची? कसे जगायचे? अशा अनेक प्रश्नांनी तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.
चारही बाजूंनी जळकोट तालुक्याचा संपर्क तुटला असून जनजीवन ठप्प झाले आहे. जिरगा-ढोरसांगवी-धामणगाव, माळहिप्परगा-पाटोदा खूर्द, शेलदरा-वडगाव-होकर्णा-केकतसिंदगी, जगळपूर बु-कुमठा-शिवनखेड, घोणसी-अतनूर, जळकोट-सोनवळा-बेळसांगवी-वाढवणा बु, वायगाव-कुमठा-धामणगांव, मेवापूर-अतनूर, कंधार-जळकोट-उदगीर राष्ट्रीय महामार्ग आदी मार्गांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने या मार्गांची वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे.
बेळसांगवी येथे तिरू नदीने रौद्ररूप धारण केले आहे. तिरुका येथे तिरू नदीवरच्या पुलावरुन पाणी जात असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मरसांगवी येथे तिरू नदीच्या विक्राळ रूपामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करंजी येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला असून त्यामुळे प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. तलावाजवळील शेतीचे नुकसान होत आहे. आज (27 सप्टेंबर 2025) रोजी सकाळी जळकोट मंडळात 85 मिलीमीटर तर घोणसी मंडळात 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Beed News : पुरातून वाचलेल्या सहा शेळ्या, दोन मेंढ्यांचा बिबट्याने काटा काढला
विविध रस्ते बंद असल्याने व पुराची परिस्थिती असल्याने तालुक्यातील जनतेने या काळात प्रवास करू नये, शेताकडे जाऊ नये, बचावात्मक योग्य ती खबरदारी तालुक्यातील शेतकरी व जनतेने घ्यावी, असे आवाहन जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी केले आहे. प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असेही ते म्हणाले.
बेळसांगवी येथे ड्रोन पाहणीची मागणी
बेळसांगवी गावाला तिरू नदीच्या पुराचा भयंकर असा वेढा पडला असून धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावाची वाहतूक बंद आहे. शिवारातील अनेक शेतकऱ्यांची पाईपलाईन व विद्युत मोटारी वाहून गेल्याचे शेतकऱ्यांने सांगितले. तिरू नदीच्या पाण्याचा गावाला पडलेला वेढा व धोका लक्षात घेऊन बेळसांगवी येथे ड्रोन कॅमेराद्वारे पाहणी करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
बेळसांगवी येथे झालेले नुकसान, पुराचा धोका, शेतकरी व नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या गावात ड्रोन कॅमेरा द्वारा पाहणी करुन धोकादायक परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, अशी ग्वाही उदगीरचे उप विभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली.





























































